Monday 28 July 2014

एक प्रश्नचिन्ह.....

पूर्णविरामाच्या शोधात ठेचकाळलेलं विरामचिन्ह
अन त्यातनं जन्माला आलेलं एक प्रश्नचिन्ह

एक प्रश्नचिन्ह सर्वांनाच पडलेलं
आपापल्या परीने अपूर्णात अडकलेलं

प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह
त्यातलच कोडं
कोड्यातलं गणित
गणितातला विभाजक
अन उरलेली बाकी
तशीच अपूर्ण

आणि पुन्हा नव्यानी पडलेलं एक प्रश्नचिन्ह
अन पूर्णविरामाच्या शोधात ठेचकाळलेलं विरामचिन्ह


सोनाली गाढवे देशमुख. दि. २८ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.




Tuesday 22 July 2014

आठवण.....

मला कोडयात टाकणारे अनेक प्रश्न 
तिनं तिच्या डोळ्यात साठवलेत….…. 

आज ते क्षण न क्षण सोबत घालवलेले 
पुन्हा नव्याने आठवलेत ……. 


सोनाली गाढवे देशमुख. दि. २२ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.






Monday 21 July 2014

पहाट...

काळोख निघाला ओलांडूनी कृष्णतीर 
वाजे राउळी चौघडा, विझे चांदण्यांची रांग…..
उगवला नारायण , सोनपाऊली उतरून
नवी पहाट नटली भक्तीत न्हाहून चिंब …… 

सारवल्या अंगणी माझ्या शुभ्र प्राजक्ताचा सडा
रांगोळीही  सांडली गं अंगणात स्वागताला ….
तुळशीवृंदावनीही साजे दिव्याची ती इवली वात 
येगं मंगल प्रहरी उंबरा ओलांडूनी आत …. 



सोनाली गाढवे देशमुख. दि. २१ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.


Place - Wai Satara
Photo courtesy - Mr. Yashpal Wagh.

Morning at the spiritual place Wai 






Saturday 19 July 2014

आठवणींचा प्राजक्त.....

तुझ्या आठवणींचा प्राजक्त
माझ्या मनी फुलाला होता 
हे पाहून उंबर्यावर माझ्या 
क्षणभर सुर्य हि थोडा  रेंगाळला होता …… 

सांजवेळी अशा या मग 
आभाळानी  घेतल झुकतं माप 
आणि चंद्राच्या चांदण्यांना दिली 
अलगद करून मोकळी वाट ……



सोनाली गाढवे देशमुख. दि. १९ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.










Friday 18 July 2014

कवितेतला तू

माझ्या अश्रूंचा एक थेंब 
हळूच कवितेत जाऊन लपला ,

अन कवितेतला तू वाचून 
तोही मुक्यानेच रडला.…


सोनाली गाढवे देशमुख. दि. १८ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.




Thursday 17 July 2014

तुझी जीवघेणी नजर  
खोलवर रुतलेली…… 
पापण्या आड दडून 
गालातल्या गालात हसलेली……. 




सोनाली गाढवे देशमुख. दि. १७ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.






Wednesday 16 July 2014

आठवणींची सर ...

आठवणींची सर अलगद येते भूतकाळातल्या क्षणात हरवून जाते ,
ओलावतं हसू ओलावतात क्षण ओलावतात पापण्या ओलावतं मन 

कठीण जात मग बाहेर पडताना आठवणी मनाशी कुरुवळत स्वतःशीच झगडताना 
आभाळाचाही कंठ दाटून येतो मग तो हि आज तसाच बरसतोय बघ …


सोनाली गाढवे देशमुख. दि. १६ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.








Tuesday 15 July 2014

तुझ्यातलीच मी व्हायचंय मला ....

ती  वाळूतली पाऊल खूण व्हायचंय मला
जिला तुझ्या स्पर्शाच वेड लागून जाईल
तो पहिल्या पावसाचा थेंब व्हायचंय मला
जो तुझ्या गालाच्या स्पर्शानी ओघळायचच विसरून जाईल

ते पाण्यातलं प्रतिबिंब व्हायचंय मला
ज्यात तू स्वतःला नकळत न्याहाळत राहशील
ते शुभ्र चांदणं व्हायचंय मला
जे अंधारातही तुझ्या डोळ्यात सामावून जाईल

तुझ्या गालावरचं खोडकर हसू व्हायचंय मला,
जे नकळत माझ्या रुसव्याच कारण बनून जाईल
ती हवीहवीशी आठवण व्हायचंय मला 
जी नेहमी तुला एकटेपणा पासून दूर ठेवत राहील

तुझ्या पापणीतल गोड स्वप्न व्हायचंय मला
जे पाहताना गाली खळी उमटून जाईल
तो मोहक श्वास व्हायचंय मला
जो तुझ्या नसानसात सदैव सळसळत राहील



सोनाली गाढवे देशमुख. दि. १५ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.




Monday 14 July 2014

आस..


तो बघ किनारा लाटेच्या स्पर्शासाठी झुरतोय,
स्वताच अस्तित्व विसरून तिच्यातच हरवतोय…. 
तीच येणं जाणं नियतीनेच ठरवलेलं,
तरीही तिची आस बाळगून पाणावलेल्या डोळ्यांनी पाहतोय.… 



सोनाली गाढवे देशमुख. दि. १४ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.




Saturday 12 July 2014

आठवणीतला पाऊस.......

पावसाची आणि माझी पडली जेव्हा गाठ
मी नुसताच पाहतच राहीलो तेवढ्यात त्याने धरला माझा हात ….
थांब थांब म्हणत पळत सुटलो कोपऱ्यात
तेवढ्यात तो पोहचला माझ्या सर्वांगात …….

म्हणाला काय आहे ना दोस्ता तुम्हाला आहे विसरायची हौस
अरे तोच मी शाळेतला कट्ट्यावरचा पाऊस …….
तुमचा कट्ट्यावरचा ग्रुप अजूनही आठवतोय
माझी वाट पाहणारी पोरं तुम्ही आता नुसत्याच आठवणी साठवतोय…….

कचाकचा चिखलात माझ्यासोबत खेळायचात
आता मात्र इस्त्रीच्या कपडयावर एक ठिपका हि नाही खपायचा …….
बिझी लाईफ schedule मध्ये हरवून गेलात तुम्ही
पण मी येतो पूर्वीसारखाच गात गाणी जुनी ……

मी आजही येतो जुने रस्ते गल्ली ,चहाच्या टपऱ्या शोधत असतो ,
वाटतं कुठेतरी भेटाल नी हिरमुसून माघारी फिरतो ……
आज अचानक भेटलास अन आनंदाश्रु वाहिले
त्यातच थोडा भिजला असशील sorry म्हणतो पहिले ……

बदललात राव तुम्ही सारे म्हटलं तुला आठवण करून द्यावी 
अन आठवणीतल्या पावसाची एक कविता ऐकवावी …..



सोनाली गाढवे देशमुख. दि. १२ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.




Friday 11 July 2014

पाऊस

आसवं बनून डोळ्यात उतरतो मातीचा सुगंध बनून श्वासात मिसळतो 
पाठ शिवणीचा खेळ खेळत हुरहूर लावतो भेटल्यावर आठवणीत चिंब भिजवत...

अल्लड बेधुंद वाऱ्यासोबत नाचतो उरातल्या वादळाची उत्तरं बनून जातो 
ओठांवरच गमावलेलं हास्य घेऊन येतो निसटलेल्या शब्दांची साथ बनून जातो.... 


सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.





Thursday 10 July 2014

तुझी भिरभिरणारी नजर


तुझी भिरभिरणारी नजर माझ्यावर येउन खिळलेली
पापणीही न लवता माझ्याच नजरेत मिसळलेली
डोळ्याच्या वाटेने हळूच मनापर्यंत पोहचलेली
मनाचं दार उघडून अंतरंगात विसावलेली.

अचानक सगळ्या कोड्याची उत्तरं गवसलेली
रणरणत्या उन्हात देखील चांदण्यात न्हाऊन निघालेली
सुखद मोरपिशी स्पर्शाने शहारलेली
अन मी वेडी त्या एका नजरेतच
माझं अस्तित्व गमावून बसलेली.



सोनाली गाढवे देशमुख. दि. १० जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.








Tuesday 8 July 2014

हरवलेलं नातं


काही नाती अशीच असतात , रेशमी धाग्याला नकळत पडलेल्या गाठीसारखी 
ती गाठ कधी पडली विचार करता करता घट्ट  होत जाते न सोडवता येईपर्यंत 
ती गाठ तिथच तोडून दिली तरी धागा पुर्ववत होत नसतो , तो ताणतो अन विरळ होतो कायमचा  
नात्यांचही तसच …………… 

आपली वाटणारी माणसं गर्दीलत्या माणसात विरघळून जातात नकळत
नकळत होणारे गैरसमज आणि त्यामुळे नात्यांची विण घट्ट करता करता उसवत गेलेली ,उधसलेली खोलवर कुठतरी ………  
उसवलेले टाके पुन्हा घालता येतात का , आणि आलेच तरी पुन्हा न उधसण्या  इतपत तर नक्कीच नाही ना 
मग ते आत आत उसवलेलं असच घेऊन जगायचं , 
ते उधसलेपण पापण्यात दडवायचं ओठात अडवायचं , 
मनातल्या कप्प्यात डांबून ठेवायचं अगदी खोल आणि कुणाला जाणवू हि नाही द्यायचं, विस्कटलेल कपाट सावरावं तसं सावरायचं कुणाला कळू नये म्हणून 
कसली अजब तारेवरची कसरत 
कारण एकच…  आपणच गुंतलेलो असतो त्या नात्यात ,आणि तो गुंता सोडवता सोडवता गुरफटत गेलेलो असतो , कदाचित आपलीच इच्छा नसते का बाहेर पडायची …… 
खरंच नाती पुन्हा नव्यानी विणता आली असती तर ……… आयुष्य ,जगणं सोप्पं झालं असतं का ?


सोनाली गाढवे देशमुख. दि. ०८ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.






Monday 7 July 2014

........

तुझ्या डोळ्यातले खोल डोह
हृदयाचा ठाव घेतात
तुझ्या पापण्यांची ती उघडझाप 
फुलापाखारही लाजतात.

तुझ्या प्रत्येक हालचालीचे क्षण
मनात रुतत जातात
अन आठवण पक्षांच्या थव्यासोबत
दुरूनच नाचतात. 


सोनाली गाढवे देशमुख. दि. ०७ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.







Saturday 5 July 2014

सोबत


भर दुपारी माझ्या उंबर्यावर चांदणं का बरं रेंगाळलं होतं ?
तुझ्या डोळ्यातलं गुलमोहोराच झाड जे माझ्या मनी फुललं होतं ….

तुझ्या दुःखाचा व्रण माझ्या मनीही उमटला होता ,
का कुणास ठाऊक सोबतीचा अर्थच जणू गवसला होता……


सोनाली गाढवे देशमुख. दि. ०५ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.








Friday 4 July 2014

गुंफण


अथांग सागरात फिरून यायला मनाला शरीराची गरज नसते
ते केव्हाही कुठही अलगद उडून जात फुलपाखरासारखं,
आभाळभर फिरायलाही त्याला पंखांची गरज नसते ,
थकत का कधी ते जाणवतच नाही

डोळ्यांच्या अबोल भावनांना ओठातल्या शब्दाची गरज नसते
त्यांची भाषा मूकपणे व्यक्त होते

प्रत्येकाचं आपापल एक वेगळ अस्तित्व तरीही एकमेकात गुंतलेले
त्या झाडाला बिलगून वाढणाऱ्या चिवट वेली सारखं
ती कितीही स्वतंत्रपणे वाढली तरी भावनांची गुंफण काही सुटत नाही
मग ते मन असो भावना असो वेदना असो वा शरीर असो...........

म्हणूनच माणूस परिपूर्ण म्हणवला जात असावा का ?



सोनाली गाढवे देशमुख. दि. ०४ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.





Thursday 3 July 2014

पहिलं प्रेम

खरंच का हे पहिलं प्रेम असतं पहिल्या पावसागत
पाऊस पडून गेल्यावर येणाऱ्या मातीच्या त्या सुगंधागत.....

खरंच का हे पहिलं प्रेम असतं गुलाबी थंडीगत  
हळुवार वाऱ्याच्या झुळुकेनी शहारे आणणाऱ्या स्पर्शागत.....

खरंच का हे पहिलं प्रेम असतं सोनेरी स्व्प्नांगत
हसता हसता ओलावणाऱ्या अन भिजणाऱ्या त्या पापण्यांगत ......

पहिलं पहिलं प्रेम पहिल्या वेड्या कवितेगत
पहिलं पहिलं प्रेम पहिल्या पाटीवरच्या श्रीगत..... 



सोनाली गाढवे देशमुख. दि. ०३ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.







Wednesday 2 July 2014

तुझी सोबत

तुझी सोबत.......
भुरभुरणाऱ्या पावसाच्या श्रावण सरीसारखी
क्षणात सोबत तर क्षणात कुठतरी गुडूप होणारी , हुरहूर लावणारी ,
हिरमुसले गेले कि अचानक बरसणारी , माझ्या मनी अन अंगणी ताल धरणारी पावसाची सरच ती  ,
सर जुनं विसरून नव्याने जगायला शिकवणारी कोवळ्या फुटलेल्या पालवी सारखी,

तुझी सोबत…....
आठवण पक्षांचा नाच बनून राहिलेली , दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली .
माझ्या ओंजळभर स्वप्नाचं चांदणं बनून राहिलेलीआठवणीतच गुंतलेली अन आठवणीतच उसवलेली

तुझी सोबत ……
भावनांचा हीशोब मांडणारी शब्दहीन कवितेची ओळ जशी ,
आभाळभर साठून हि बरसणं विसरलेली सर जशी.


सोनाली गाढवे देशमुख. दि. ०२ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.