Monday 30 June 2014

मंतरलेली संध्याकाळ

का कुणास ठाऊक , उन्हाशी पाठशिवणीचा खेळ खेळत संध्याकाळ उंबऱ्याशी येते
अन माझ्या जीवाला उगीचंच हुरहूर लागते ,
भीती असते का ती स्वप्नांच्या गावात हरवण्याची कि चांदण्यांच्या अंगणातल्या खेळात चंद्राने  डोकावण्याची ,
कसली हि मनाची घालमेल, उगीचच लागलेली रुखरुख , कसली तरी भयाण पोकळी जाणवते खोलवर,
अन त्या सूर्याला ढळताना बघत धडधडणार काळीज , तो उद्या उगवेल माहित असूनही गांगरून गेलेलं।  वेडं काळीज ...........
नकळत ओघळणारा अश्रुंचा थेंब , पापणी ओलावलेली  जाणवतही नाही , जाणवत जेव्हा ओलावलेल्या गालाला थंडगार झुळूक लगट करून जाते ,
अन नको होऊ दे संध्याकाळ असा वाटणारं वेडं मन ती संपायलाही नको असा हट्ट करू लागतं ,
उगाचचं त्या एकांताची सोबत अशीच राहावी वाटते , तेही भीतीनेच का सावली हि सोडून जाईल या विचारांनी?
कसलं हे मनाचं लाजीरवान वागणं सतत कुणाचीतरी अपेक्षा करणारं , जणू काही स्वताच अस्तित्वाचं नाही मूळी त्याला,
मग पुन्हा कुठतरी नवीन अपेक्षा, नवी चाहूल घ्यायची आस , खरे का खोटे पण पुन्हा तेच आभास ,
पावलांना तर आवरता येईल मनाला कसं आवरू , पावलं नाहीत भरकटणार पण मनाला कसं सावरू ,
पुन्हा सगळी प्रश्न कोडी सोडवूनही हि निरुत्तरित झालेलं मन कुठून सुरु अन कुठ संपतं त्याचा थांगपत्ताच नाही.

अन त्यातच झालेली रात्र , अंगणात  पडलेला चांदण्यांचा डाव

अन संपलेली ती मंतरलेली संध्याकाळ नेहमीसारखीच नुसतीच हुरुहूर लाऊन गेलेली उद्या पुन्हा येण्यासाठी 




सोनाली गाढवे देशमुख. दि. ३० जून  २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.