Wednesday 17 September 2014

सोसल तेवढंच सोशल !!!

सोशल नेट्वर्किंगचे फायदे अन तोटे असा लेबल लावून मला खरंतर कुठलाही मापदंड लावायचा नाहीये कारण सोशल होणं चूक का बरोबर हा ज्याचा त्याचा वयक्तित प्रश्न आहे. पण माणसा माणसातला कम्युनिकेशन कमी होत चाललं आहे अस वाटता वाटता ते बंदच झाल आहे याचा मनातला सल स्वस्थ बसू देईना.
खरच Chatting वर संवाद कितपत होऊ शकतो जो रोज रात्री एकत्र जेवण घेताना पूर्वी व्हायचा ? कधीकधी वाटतं माणसं मुकी झाली आहेत यामुळं त्यांचे शब्द नाही हाताची बोटं बोलू लागली आहेत आजकाल.

जग इतकं जवळ आलंय कि कितेक किलोमीटर दूर असलेले मित्र एका click नि जवळ येउन पोचले पण हाताच्या अंतरावर असणारे रक्ताची नात्यातली माणसं कोसो दूर झालीयेत. घरातले संवाद कमी, बोलणं कमी, ओघाओघाने त्यातून निर्माण झालेला दुरावा यात कितपत लक्ष घालतात हि मंडळी जी रोज ढिगाने फिलिंग ह्याव फिलिंग त्याव च्या पोस्त लाईक करतात.  त्यावर comment करतात.
एकाच घरात राहून अनेक भिंती उभ्या असलेल्या यांच्या मनात खूप मोठी जागा असते अनोळखी माणसांसाठी….  भलमोठं हजारोंच circle  असतं यांचं , पण त्याच बरोबर अपुर्या संवादामुळे दुरावलेली नाती , ओलावा ,प्रेम टिकून राहायचा असेल किंवा पुन्हा निर्माण करायचं असेल तर कितीजण प्रयत्नशील असतात यातली? कुठेतरी या सर्वांचा समतोल साधला गेलाच पाहिजे पण त्यासाठी आत्मपरीक्षण केलं गेल पाहिजे.
दुर्दैवी हे वाटत कि एखाद्या अपघात अथवा नैसर्गीक आपत्तीच्या बातम्यांना हि हजारो लाईक मिळतात , या घटना कुणाला कशा आवडू शकतात हा अजून एक मला पडलेला गंभीर प्रश्न.

वयाने अजाण प्रगल्भ नसणाऱ्या पिढीला या सुविधा पुरवणारे पालक जबाबदार तरी कसे म्हणावेत , दुसर्याच बाजूला कुठतरी सुशिक्षित पुढारलेली पिढीही यात गुरफटलेली आहेच कि. काळाची अन वेळेची मर्यादा नाही….  लॉगीन आणि लॉग ऑट न प्रत्येकाचं आपापलं स्वतंत्र अन सोप्पं जग बनलं….  ज्यात कुणाचाही हस्तक्षेप नसतो. सहज उपलब्ध झालेले तंत्रज्ञानमोबाईल क्रांती यानं अवघं जग व्यापून जावं बघता बघता तुफान वेगाने अगणित लोकांपर्यंत पोहचण्याची क्षमता असलेलं सोशल नेटवर्क लोकप्रिय न व्हावं तर नवलच.

दृष्टीआडची सृष्टी आभासी असली तरी हवीहवीशी वाटू लागली अन वास्तवाचं भान सुटलं , तरीही अगदीच परिस्थिती निराशाजनक नाहीये सोशल नेटवर्क नेमकं कशासाठी आणि यातून काय मिळवायचं आहे याचं भान ज्याचं त्याला योग्य वेळी ठेवता यावं इतकंच……  

अन म्हणूनच मला वाटत हे सोसल तेवढंच  सोशल  असावं प्रत्येकानी... नाही का


सोनाली गाढवे देशमुख. दि. १७ सप्टेंबर २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.