Wednesday 17 September 2014

सोसल तेवढंच सोशल !!!

सोशल नेट्वर्किंगचे फायदे अन तोटे असा लेबल लावून मला खरंतर कुठलाही मापदंड लावायचा नाहीये कारण सोशल होणं चूक का बरोबर हा ज्याचा त्याचा वयक्तित प्रश्न आहे. पण माणसा माणसातला कम्युनिकेशन कमी होत चाललं आहे अस वाटता वाटता ते बंदच झाल आहे याचा मनातला सल स्वस्थ बसू देईना.
खरच Chatting वर संवाद कितपत होऊ शकतो जो रोज रात्री एकत्र जेवण घेताना पूर्वी व्हायचा ? कधीकधी वाटतं माणसं मुकी झाली आहेत यामुळं त्यांचे शब्द नाही हाताची बोटं बोलू लागली आहेत आजकाल.

जग इतकं जवळ आलंय कि कितेक किलोमीटर दूर असलेले मित्र एका click नि जवळ येउन पोचले पण हाताच्या अंतरावर असणारे रक्ताची नात्यातली माणसं कोसो दूर झालीयेत. घरातले संवाद कमी, बोलणं कमी, ओघाओघाने त्यातून निर्माण झालेला दुरावा यात कितपत लक्ष घालतात हि मंडळी जी रोज ढिगाने फिलिंग ह्याव फिलिंग त्याव च्या पोस्त लाईक करतात.  त्यावर comment करतात.
एकाच घरात राहून अनेक भिंती उभ्या असलेल्या यांच्या मनात खूप मोठी जागा असते अनोळखी माणसांसाठी….  भलमोठं हजारोंच circle  असतं यांचं , पण त्याच बरोबर अपुर्या संवादामुळे दुरावलेली नाती , ओलावा ,प्रेम टिकून राहायचा असेल किंवा पुन्हा निर्माण करायचं असेल तर कितीजण प्रयत्नशील असतात यातली? कुठेतरी या सर्वांचा समतोल साधला गेलाच पाहिजे पण त्यासाठी आत्मपरीक्षण केलं गेल पाहिजे.
दुर्दैवी हे वाटत कि एखाद्या अपघात अथवा नैसर्गीक आपत्तीच्या बातम्यांना हि हजारो लाईक मिळतात , या घटना कुणाला कशा आवडू शकतात हा अजून एक मला पडलेला गंभीर प्रश्न.

वयाने अजाण प्रगल्भ नसणाऱ्या पिढीला या सुविधा पुरवणारे पालक जबाबदार तरी कसे म्हणावेत , दुसर्याच बाजूला कुठतरी सुशिक्षित पुढारलेली पिढीही यात गुरफटलेली आहेच कि. काळाची अन वेळेची मर्यादा नाही….  लॉगीन आणि लॉग ऑट न प्रत्येकाचं आपापलं स्वतंत्र अन सोप्पं जग बनलं….  ज्यात कुणाचाही हस्तक्षेप नसतो. सहज उपलब्ध झालेले तंत्रज्ञानमोबाईल क्रांती यानं अवघं जग व्यापून जावं बघता बघता तुफान वेगाने अगणित लोकांपर्यंत पोहचण्याची क्षमता असलेलं सोशल नेटवर्क लोकप्रिय न व्हावं तर नवलच.

दृष्टीआडची सृष्टी आभासी असली तरी हवीहवीशी वाटू लागली अन वास्तवाचं भान सुटलं , तरीही अगदीच परिस्थिती निराशाजनक नाहीये सोशल नेटवर्क नेमकं कशासाठी आणि यातून काय मिळवायचं आहे याचं भान ज्याचं त्याला योग्य वेळी ठेवता यावं इतकंच……  

अन म्हणूनच मला वाटत हे सोसल तेवढंच  सोशल  असावं प्रत्येकानी... नाही का


सोनाली गाढवे देशमुख. दि. १७ सप्टेंबर २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.



Tuesday 16 September 2014

लग्न - दामदुप्पट योजना

लग्न - दामदुप्पट योजना

आधीच आपल्या सभोवती विणलेल्या नात्यांची दुपटीने भर ……

रक्ताचीच अस नाही पण आपलेपणानी जन्माला आलेली नाती …. तिची अन त्याचीही…….  त्याचे आई बाबा, बहिण भाऊ, आजी आजोबा, चुलत मावस भावंड , शेजारची काकु  शेजारची मावशी, मामा , मित्र मैत्रिणी शाळेपासूनचे ते नोकरी पर्यंतचे , गल्लीपासून ते फेसबुक पर्यंतचे .

तिने सगळ्यांना सामावून घ्यायचं , त्यांच्यातलं एक बनायचं आणि सोबत आपली नातीही टिकवायची…. पण तिनेच ??? हीच तिची नाती तोही तितक्याच सहजतेने स्वीकारतो का ??? त्यांना तेवढ्याच आपुलकीने जपतो का ??? निव्वळ तिनं घर सोडण्याच्या संकल्पनेवरून तिनंच सगळं स्वीकारावं ??? त्याच्या बाबतीत याच कक्षा अरुंद होत जातात …… नात्यांच्या वर्तुळाचा परीघ छोटा होत जातो ……  अन तो  तिच्या सख्या नात्यांपुरताच  मर्यादित होतो अन त्यातही बिचारी ती धन्यता मानते……   का ??? तिच्या इतपत तो तिच्या एखाद्या मित्राला स्वीकारू शकतो ??? तिचं जग तिचं वलय नुस्त अनुभवण्यासाठी तरी त्यात कधी प्रवेश करू पाहतो का तो ???

तिच्यासाठी  हि दामदुप्पट प्रेमातही झालेली असते….  माणसांबरोबरच  त्यांचं  प्रेम हि दुप्पट होत असं मानणारी ती . पण हेच प्रमाण त्याच्या बाबत लागू पडतं का?
पण हि दामदुप्पट केवळ तिलाच लागू पडते का ???


सोनाली गाढवे देशमुख. दि. १६ सप्टेंबर २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.



Saturday 13 September 2014



बाबा............


निशाला दिवस गेल्यापासून सर्व काही स्वप्नमय झालं होतं, रवीच्या तर आनंदाला स्वप्नांची झालर लागली होती केव्हाच...... नसेल तसलं कोड कौतुक करत होत्या सासूबाई, तिला कुठे ठेवू नि कुठे नको झालं होतं साऱ्यांना. निशा तर आपल्याच वेगळ्या विश्वात रममाण होती एवढं सुख तिच्या आभाळा एवढ्या पदरात मावेनास झालं होतं.

निशा एका चांगल्या सुसंस्कुत घरातली मुलगी. प्रेमविवाह करताना आई-बाबांच्या भुवया उंचावल्या पण अडथळI म्हणून नाही, काळजी म्हणून पण मग एकुलत्या एक मुलीसाठी तिचे सारे निर्णय मान्य झाले. शेवटी लाडात वाढलेली पोर, लग्न होऊन रवीच्या घरी  सर्व सुखात न्हाऊन निघाली नि आई-बाबांनी चिंता सोडली. रवि आणि निशा पूर्वी एकाच ऑफिसात काम करणारे डीपार्टमेंट मात्र वेगवेगळे. त्याच आई-टी नि तिच अड्मीन. निशाची नि रवीची  ओळख झाली नि मग प्रेमात रुपांतर झालं. निशा तशी साधन कुटुंबातली पण हौस म्हणून नोकरी करणारी हुशार मुलगी ,पुढे राविच्याच प्रोत्साहनान  MPSC च्या परीक्षेला बसून सरकारी नोकरी मिळालेली आणि रवि नवीन जॉब मध्ये सेटल झालेला कशाचीही कमी नाही, सासूने तर आईपेक्षाही माया लावली आणि मग निशाही मुलीप्रमाणे सारं  काही करू लागली . 


दोघांच्याही आफिसात गोड बातामी पसरली नि शुभेच्छांचा वर्षाव झाला. नातेवाईक, मैत्रिणी, कलीग सारेच कौतक करत होते निशाच, नि रवि तर खूप काळजी घेत होता. खाण्यापिण्या कडे आईचे  लक्ष असलं तरी तिला फिरायला घेऊन जाणं तिला खुश ठेवण्याच काम रविच होतं नि तो ते जातीनं  करत हि होता . या रविवारीही संध्याकाळी समुद्रकिनारी गेली दोघ. त्या फेसाळ लाटा पाहताना  नि त्या वाळूवरून चालताना निशा हरवून गेली होती. अचानक निशा म्हणाली " रवि ऐक विचारू "

"अच्छा तर आता परवानगी घेऊन विचारनार का तुम्ही राणीसाहेब?" 

"रवि असं रे काय" निशा थोडी लटक्या रागात .....

"अगं अगं विचार म्हटलं न मी, आता मला तुझ्या कंटीन्युअस प्रश्नांची उत्तरं द्यायची सवय ठेवायला हवी म्हणतो मी. तुझं बाळ हि तुझ्यासारखच चिवचिव करणार नाही का माझ्या मागे "

" हो बाबा हो .आता मी काय म्हणते ते ऐकणार आहात कि तुमचीच बडबड मी एकू "

"नाही गं राणी... बोल मी एकतो आहे, बोल"

"रवि तुला आपल बाळ......म्हणजे कोण होईल .....म्हणजे काय व्हायला हवंय मुलगा कि मुलगी ?"

"अरे बापरे मला वाटला तू आताच विचारतेस कि डॉक्टर कि इंजिनीअर "रवि स्वताच्याच जोक वर खळखळून हसतो.

"रवि मी तुझ्याशी सिरीअसली काहीतरी बोलतेय आणि तुला थट्टा कसली रे सुचते" निशा आता रडकुंडीला येउन बोलते.

"sorry sorry अगं मस्करी करत होतो मी , मलाना छानशी इवल्याश्या डोळ्यांची , लुसलुशीत ओठांची नि तुझ्यासारख्या बसक्या नाकाची मुलगी हविय." रवि तिच नाक ओढत म्हणतो .

निशा मनोमन सुखावते पण खोट लटक रागवत म्हणते " मी होय बसक्या नाकाची आधी माहिती असतं तर सर्जरी करून घेतली असती नाही का?"

दोघही निखळ हसतात नि स्वप्नांचा बंगला बांधायला सुरुवात होते. मग ती कशी असेल, कशी दिसेल, काय खाईल नि काय घालेल सर काही सामावत त्यात.

"मला तर कठीणच जाईल तिला सोडून आफिसात जायला, रडेल का रे मागाहून... आई आहेत तशा सांभाळायला ....."

तिचं वाक्य मधेच तोडून "आणि हो मग मी संध्याकाळी लवकर येउन तिला चोक्लेट देईन नि ती म्हणेल बाबा किती चांगला नि आई किती दुष्ट ,मग मी नि ती एक पार्टी बनवू आणि तू नि आई दुसर्या पार्टीत, तू तिला शाळेत सोडायला जा नि मी आणायला जाईन बाहेरच्या पोरांबरोबर दंगामस्ती केली कि तू ओरड तिला, मग मी तिला चोक्लेट देईन नि तुझ्याशी कट्टी घेऊ, तूच तिच्यावर संस्कार कर माझ्या घरातले नि तुझ्याकडचेही "

" हो पण शाळा कॉलेजात जायला लागल्या वर कशी रे एकटी जाईल ती बस रिक्षाचा प्रवास झेपेल का रे तिला ? नको तिला आपण अगदी जवळच्या शाळेत घालू , आणि अशी शाळा नाही मिळाली तर शाळेच्या आजूबाजूला शिफ्ट होऊ आपण"

"अगं हो हो पण म्हणून काय तू तिला घर कोंबडी करणार आहेस का? मोठी झाल्यावर तिची मतं, विचार सर्व काही स्वतंत्र असेल आणि झेपेल का चा अर्थ काय गं ? बाहेर पडल्याशिवाय का कळणार आहे बाहेरच जग तिला ,शिकेल ती सगळं हळू हळू इंडिपेंण्डट बनावायच तिला तुझ्यासारखं "

तुझ्यासारख म्हटल्यावर ती भानावर आली अरे हो मी हि जाते कि रोज बाहेर पण म्हणूनच तर भाती वाटते 

आजकाल काय काय होतय आजूबाजूला. शेअर  रिक्षातल्या तो नकोसा  स्पर्श, बसमधल्या हपापलेल्या नजरा झेलतेच कि मी रोज , स्टेशन परिसरात काय नि बिल्डिंग च्या आवारात टवाळ टोळ्क्यातून आलेल्या कमेंट्स, कधी कधी फाईल देताना झालेला जाणीवपूर्वक स्पर्श हि झेलते .पण वेळ पडल्यावर फिरून मुस्कटात दयायची हिम्मत हि ठेवते , तेवढी स्ट्रोन्ग बनेल का रे ती ? एवढासा तो जीव या भयाण दुनियेत कशी बरं जगायला शिकेल?  नको आपन तिला कुठेच नको पाठवायला , एवढासा राहू दे माझं पिल्लू ,सतत मझ्या भोवती लुडबुड करणारं , मोठ्ठीच नको होऊ देत "

रवि चक्क चकार शब्द न बोलता एकत होता, म्हणाला " अगं वेडी बिडी आहेस का तू, तू बाहेर पडताना का नव्हती वाटली काळजी तुझ्या आई-बाबांना पण म्हणून त्यांनी तुला डांबल तर नाही नं घरात  ? जगू दे तिलाही घेऊ  दे मोकळा श्वास या जगात करू देत कसरत रोजची मगच ती स्ट्रोन्ग बनेल ,आपण बनवू तिला strong तुझ्यासारखी . सेल्फ इंडिपेंडट , सेल्फ प्रोटेक्टिव तिला कराटे जुडो म्हणशील तर शिकवू पण मला सांग आज बाहेर पडणारी प्रत्येक स्त्री कराटे जुडो चा क्लास करून आलेली असते का ? ती आपोआपच स्वताला रुजवते समाजात , खंबीर बनते आणि बनवतेही.

किनाऱ्यावर चणे विकणाऱ्या चणे वाल्यांनं त्यांची तंद्री मोडली त्यांच्या स्वप्नाचा बंगला उंच पोचला होता तोवर नि मग आतापर्यंत न एकू आलेल्या लाटांचा आवाज एकू येवू  लागला निशा नि रवि एकमेकांकडे पाहून हसले खळकन त्या फेसाळणाऱ्या मुक्त लाटेसारख हा विचार करून कि आई-बाप होण नि ती काळजी कारण काय असतं ते आई-बाप झाल्याशिवाय नाही तर कल्पनेनही कळू लागलाय आपलाल्या. त्यान एक हात तिच्या खांद्यावर टाकला किती भावना होत्या त्यात प्रेम विश्वास आधार सार काही आलं एका स्पर्शात नि ती दोघ फिरली घराच्या दिशेनं  नाही घराच्या ओढीनं.

आज सकाळी तिला कसल्याशा आवाजाने जाग आली रवि तोवर तयारही झाला होता ,आज थोडा उशीरच झाला होता उठायला नि मग देवघरातल्या घंटीचा आवाज आला निशाने रविला निरोप देऊन तयारी केली. आळसावली असशील तर जाऊ नको सांगितलं होत सासूनं, तरीही ती त्यांची समजूत काढून निघाली.

दिवसभराच्या कंटाळवाण्या कामानंतर घडाळ्यामध्ये  पाचच्या ठोक्यांची वाट बघू लागली. निघताना घाई नको म्हणून दोनदा तयारीही करून आली.

हुश्श !!! एकदाचे पाच वाजले रोजची धावपळ करून तिने  स्टेशनला नेहमीची गाडी मिळवली. ट्रेन मध्ये फेरीवाल्यांचा  नेहमीचा  कलकलाट चालू झाला नि मग कुठून तरी "बेबिक्लीप, हेअरबँड, नेलपेंट ,लिपस्टिक , काजल ले लो ......" एकू आलं त्यातल्या 'बेबिक्लीप' हा शब्द आज चटकन  तिचं  ध्यान खेचून गेला आणि ति ते नेल्पेंट च बॉक्स चाचपू लागली, अरे हे काय ३-४ वर्षाची पोर होती त्याच्या खांद्यावर निजलेली. तिला सावरत सावरतच तो लटकवलेल्या क्लीप्सना सरळ करण्यात गुंतलेला. कुणीतरी कुजबुजली दुसरीच्या कानात – एवढ्या लहान पोरीला घेऊन फिरतोय एवढ्या गर्दीत ,काही नाही गं चार पैसे जास्त मिळावे म्हणून भांडवल करतात हे लोक पोरांचं." निशाने एक नेल्पेंटची बॉटल निवडली नि १०० ची नोट देऊ केली त्याला. तोवर स्टेशन जवळ येऊ लागलं त्याने घाईघाईत खिसे चाचपले आणि ५ रु कमी पडतात म्हणून " छुट्टा नही हे मेडम" म्हणत सामान आवरू लागला. 

" रेहने दो ५ रु .चलेगा "

" नही मेडमजी हम मेहनत करते हे ऐसे हि पेसे लेने होते तो भिक मांगता ट्रेनो मे और एक चीज लेलो अच्ही नही लगी तो कल चेंज कर लेना , जल्दी करो उतरना हे नही तो आपके पेसे लेलो मेरा सामान दो ,जल्दी करो, जल्दी ." 

निशा नं घाईने हाताला लागेल ते नेल्पेंट घेतलं नि तोवर हा विजेच्या वेगानं दारावर पोचला नि नुकत्याच चालू झालेल्या ट्रेन मधनं चपळाईनं उतरलाही. हे इतक्या जलद गतीनं  घडलं  कि निशा थोडी भारावल्यागत झाली.

---- दुसरा दिवसही कसाबसा सरला नि ५ चे ठोके झाले. निशाला नेहमीची ट्रेन मिळालीही नि पुन्हा तोच गलबलाट सुरु झाला ट्रेनमध्ये नि कालचा आवाजही त्यात मिसळलेला  "बेबिक्लीपनेलपेंट, लिपस्टिककाजल ले लो ......"

" मेडेमजी कल का कलर अच्छा नहि लगा क्या चेंज करलो आज नाय माल हे ......." आजही ती गोंडस पोर त्याच्या खांद्यावर खेळत होती. किती गोड नि निरागस होती ती ,न राहावून निशा त्याला म्हणालीच " क्यू रोज इतने भीड मे लेके आते छोटी बच्ची को, चढते उतरते वक्त कितनी रिस्क हे , घरपे क्यू नहि छोडते " तिच्या अनपेक्षित प्रश्नानं तो चमकला,  म्हणाला " क्या करू मेडेमजी हमारा घर नही होता जिसे लॉक करके, ताला लगाके आ सके , वो तो एक भंगार के पत्रो ओर प्लास्टिक कि झोपडी हे , घर पे इसे देखने वाला कोई नही हे , इस्की मां थी... बिमार थी... चल बसी, अब वहा दिनभर केसे छोडके आऊ. लडकी हे ना, न जाने कब किस्मत का कहर टूट पडे , किसिने चुराली , कोई लेके भाग गया तो क्या करू ? इसलिये साथ लेके घुमत हु. खाणे पिणे के वक्त खिलाता भी हु , खुश रेहेती हि मेरे साथही वो, जान से भी ज्यादा एसे सांभालता हु एसे , क्या करू लडकी हे ना !!! टुकडा हे दिल का "
आवाज फुटेनासा झाला त्याचा पण लडकी हे ना  मात्र स्पष्ट एकू आलं निशाला , नि त्याच्या पापण्याच्या कडा ओल्या झाल्यागत वाटल्या ती पोर मात्र निवांत खेळत होती खांद्यावर, निर्मळ हसू होतं तिच्या गालावर.  भावूक बापाचं दर्शन झालं होतं  निशाला त्या संध्याकाळच्या मनानी आधीच बाप  झालेल्या रवित नि याच्यात काहीच फरक नाही जाणवला तिला. रोजच्याच स्टेशनला तो कसरत करत उतरलाही पण निशाचीच तंद्री लागली होती. लडकी हे ना! तिच्या कानातून मेंदूत नि मेंदूतून साऱ्या शरीरात भिनले नि मग एक हात नकळत पोटावर नि दुसरा मोबईल च्या contact मध्ये बाबा वर  येउन थांबला, 
.
.
.

"बाबा कसे आहात  ................"


टीप : कथेतला फेरीवाला बाप सत्य घटनेवर आधारित आहे.

सोनाली गाढवे देशमुख. दि. २३ एप्रिल  २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.