Saturday, 12 July 2014

आठवणीतला पाऊस.......

पावसाची आणि माझी पडली जेव्हा गाठ
मी नुसताच पाहतच राहीलो तेवढ्यात त्याने धरला माझा हात ….
थांब थांब म्हणत पळत सुटलो कोपऱ्यात
तेवढ्यात तो पोहचला माझ्या सर्वांगात …….

म्हणाला काय आहे ना दोस्ता तुम्हाला आहे विसरायची हौस
अरे तोच मी शाळेतला कट्ट्यावरचा पाऊस …….
तुमचा कट्ट्यावरचा ग्रुप अजूनही आठवतोय
माझी वाट पाहणारी पोरं तुम्ही आता नुसत्याच आठवणी साठवतोय…….

कचाकचा चिखलात माझ्यासोबत खेळायचात
आता मात्र इस्त्रीच्या कपडयावर एक ठिपका हि नाही खपायचा …….
बिझी लाईफ schedule मध्ये हरवून गेलात तुम्ही
पण मी येतो पूर्वीसारखाच गात गाणी जुनी ……

मी आजही येतो जुने रस्ते गल्ली ,चहाच्या टपऱ्या शोधत असतो ,
वाटतं कुठेतरी भेटाल नी हिरमुसून माघारी फिरतो ……
आज अचानक भेटलास अन आनंदाश्रु वाहिले
त्यातच थोडा भिजला असशील sorry म्हणतो पहिले ……

बदललात राव तुम्ही सारे म्हटलं तुला आठवण करून द्यावी 
अन आठवणीतल्या पावसाची एक कविता ऐकवावी …..



सोनाली गाढवे देशमुख. दि. १२ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.




Friday, 11 July 2014

पाऊस

आसवं बनून डोळ्यात उतरतो मातीचा सुगंध बनून श्वासात मिसळतो 
पाठ शिवणीचा खेळ खेळत हुरहूर लावतो भेटल्यावर आठवणीत चिंब भिजवत...

अल्लड बेधुंद वाऱ्यासोबत नाचतो उरातल्या वादळाची उत्तरं बनून जातो 
ओठांवरच गमावलेलं हास्य घेऊन येतो निसटलेल्या शब्दांची साथ बनून जातो.... 


सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.





Thursday, 10 July 2014

तुझी भिरभिरणारी नजर


तुझी भिरभिरणारी नजर माझ्यावर येउन खिळलेली
पापणीही न लवता माझ्याच नजरेत मिसळलेली
डोळ्याच्या वाटेने हळूच मनापर्यंत पोहचलेली
मनाचं दार उघडून अंतरंगात विसावलेली.

अचानक सगळ्या कोड्याची उत्तरं गवसलेली
रणरणत्या उन्हात देखील चांदण्यात न्हाऊन निघालेली
सुखद मोरपिशी स्पर्शाने शहारलेली
अन मी वेडी त्या एका नजरेतच
माझं अस्तित्व गमावून बसलेली.



सोनाली गाढवे देशमुख. दि. १० जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.








Tuesday, 8 July 2014

हरवलेलं नातं


काही नाती अशीच असतात , रेशमी धाग्याला नकळत पडलेल्या गाठीसारखी 
ती गाठ कधी पडली विचार करता करता घट्ट  होत जाते न सोडवता येईपर्यंत 
ती गाठ तिथच तोडून दिली तरी धागा पुर्ववत होत नसतो , तो ताणतो अन विरळ होतो कायमचा  
नात्यांचही तसच …………… 

आपली वाटणारी माणसं गर्दीलत्या माणसात विरघळून जातात नकळत
नकळत होणारे गैरसमज आणि त्यामुळे नात्यांची विण घट्ट करता करता उसवत गेलेली ,उधसलेली खोलवर कुठतरी ………  
उसवलेले टाके पुन्हा घालता येतात का , आणि आलेच तरी पुन्हा न उधसण्या  इतपत तर नक्कीच नाही ना 
मग ते आत आत उसवलेलं असच घेऊन जगायचं , 
ते उधसलेपण पापण्यात दडवायचं ओठात अडवायचं , 
मनातल्या कप्प्यात डांबून ठेवायचं अगदी खोल आणि कुणाला जाणवू हि नाही द्यायचं, विस्कटलेल कपाट सावरावं तसं सावरायचं कुणाला कळू नये म्हणून 
कसली अजब तारेवरची कसरत 
कारण एकच…  आपणच गुंतलेलो असतो त्या नात्यात ,आणि तो गुंता सोडवता सोडवता गुरफटत गेलेलो असतो , कदाचित आपलीच इच्छा नसते का बाहेर पडायची …… 
खरंच नाती पुन्हा नव्यानी विणता आली असती तर ……… आयुष्य ,जगणं सोप्पं झालं असतं का ?


सोनाली गाढवे देशमुख. दि. ०८ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.






Monday, 7 July 2014

........

तुझ्या डोळ्यातले खोल डोह
हृदयाचा ठाव घेतात
तुझ्या पापण्यांची ती उघडझाप 
फुलापाखारही लाजतात.

तुझ्या प्रत्येक हालचालीचे क्षण
मनात रुतत जातात
अन आठवण पक्षांच्या थव्यासोबत
दुरूनच नाचतात. 


सोनाली गाढवे देशमुख. दि. ०७ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.







Saturday, 5 July 2014

सोबत


भर दुपारी माझ्या उंबर्यावर चांदणं का बरं रेंगाळलं होतं ?
तुझ्या डोळ्यातलं गुलमोहोराच झाड जे माझ्या मनी फुललं होतं ….

तुझ्या दुःखाचा व्रण माझ्या मनीही उमटला होता ,
का कुणास ठाऊक सोबतीचा अर्थच जणू गवसला होता……


सोनाली गाढवे देशमुख. दि. ०५ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.








Friday, 4 July 2014

गुंफण


अथांग सागरात फिरून यायला मनाला शरीराची गरज नसते
ते केव्हाही कुठही अलगद उडून जात फुलपाखरासारखं,
आभाळभर फिरायलाही त्याला पंखांची गरज नसते ,
थकत का कधी ते जाणवतच नाही

डोळ्यांच्या अबोल भावनांना ओठातल्या शब्दाची गरज नसते
त्यांची भाषा मूकपणे व्यक्त होते

प्रत्येकाचं आपापल एक वेगळ अस्तित्व तरीही एकमेकात गुंतलेले
त्या झाडाला बिलगून वाढणाऱ्या चिवट वेली सारखं
ती कितीही स्वतंत्रपणे वाढली तरी भावनांची गुंफण काही सुटत नाही
मग ते मन असो भावना असो वेदना असो वा शरीर असो...........

म्हणूनच माणूस परिपूर्ण म्हणवला जात असावा का ?



सोनाली गाढवे देशमुख. दि. ०४ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.